Wednesday, October 18, 2017
*नोटाबंदीतल्या क्ष ची गोष्ट*
==================
८ नोव्हेंबर २०१६ ला मोदी सरकारने पाचशे आणि एक हजार रूपयांच्या नोटा रद्द केल्या. संपूर्ण देशात ह्या नोटा एकूण १५.४४ लाख कोटी रूपयांच्या होत्या, त्या पैकी १५.२८ लाख कोटी रूपयांच्या नोटा लोकांनी बँकेत जमा केल्या. नोटा जमा होण्याचे हे प्रमाण ९९ + टक्के आहे.
नोटाबंदीला तेव्हा विरोध करणारांचे आज म्हणणे आहे की देशातल्या ९९ टक्के नोटा ज्या अर्थी बँकेत जमा झाल्या, त्या अर्थी त्या सर्व एक तर मूळात व्हाईटच होत्या, किंवा बँकेत जमा झाल्यामुळे त्या आता आपोआप व्हाईट झाल्या. सगळ्याच्या सगळ्या नोटा व्हाईट झाल्यामुळे मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता. त्यामुळे उगाचच नव्या नोटा छापायचा व एकूण व्यवस्थेचा सुमारे 20000 कोटींचा खर्च देशाच्या अंगावर पडला.
*टीका आणि वस्तुस्थिती*
ही ओरड करणारांमध्ये काँग्रेसी, राजदीप सरदेसाई छाप पत्रकार, भाबडे व बडे संपादक, एनडीटीव्ही छाप चॅनेल्स वगैरे मंडळी आघाडीवर असणार हे वेगळं सांगायला नको.
आता, वस्तुस्थिती नेमकी काय आहे ते एक उदाहरण घेऊन नीट पाहू.
अशी कल्पना करा, की क्ष नावाच्या एका गृहस्थाने मे २०१६ मध्ये आपला फ्लॅट ८० लाख रूपयांना विकला. त्याने ६० लाख व्हाईट आणि २० लाख ब्लॅक रक्कम खरेदीदाराकडून घेतली. हे २० लाख ब्लॅक म्हणजे ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांची बंडलं होती.
अशा प्रकारचे व्हाईट - ब्लॅक व्यवहार गेली किमान ३५/४० वर्षे सर्रास होत आले आहेत. लोकांकडे कित्येक लाख (की कोटी?) रूपये असा ब्लॅक मनी साठलेला वा दडवून ठेवलेला आहे हे बाजारपेठेतले एक ओपन सिक्रेट होते. फक्त रियल इस्टेटच नव्हे तर लाचलुचपतीसाठी दिला घेतला जाणारा पैसा हाही मुख्यत्वे मोठ्या नोटांमध्येच होता. अधूनमधून धाडी पडल्या की ही नोटांची बंडलं लाखांनी बाहेर पडत. असो.
*क्ष यांच्या ब्लॅक मनीचं काय झालं?*
आता पुन्हा आपल्या उदाहरणाकडे वळू. क्ष यांनी ६० लाख व्हाईट चेकने घेतले. तो चेक त्यांनी आपल्या बँकेत भरला. २० लाख रूपये कॅश त्यांनी बँकेत भरली नाही. कारण ती बँकेत भरली असती तर त्यांना त्यावर कर भरावा लागला असता. तो टाळण्यासाठी त्यांनी ती २० लाखांची बंडलं आपल्या घरात लपवून ठेवली. पुढे मागे ती बंडलं सेफ डिपॉझिट लॉकर मध्ये किंवा तसच बाहेर कुठे तरी गुपचूप हलवण्याचा त्यांचा इरादा होता.
ब्लॅक मनी घेतल्याने त्यांचा सुमारे ३.५० लाखांचा कर वाचला होता. त्यांनी जर सगळेच ८० लाख चेकने घेतले असते तर हा सुमारे साडेतीन लाखांचा कर सरकारच्या तिजोरीत जमा झाला असता.
मे २०१६ ते नोव्हेंबर २०१६ ह्या काळात त्या २० लाखापैकी १ लाख रूपये कॅश त्यांनी ऑगस्ट महिन्यात एका बर्थडे पार्टीवर खर्च केली. सगळा खर्च हजार पाचशेच्या नोटा देऊन केला. खर्च कॅश असल्याने व त्यांनी रसीट नको म्हंटल्याने कॅटररने, हॉलवाल्याने कोणताही सेल्स वा सर्व्हिस टॅक्स लावला नाही. कारण तोही तो कॅश व्यवहार दाखवणार नव्हता, आणि कोणताही टॅक्स सरकारला भरणार नव्हता. त्या हॉलवाल्याला कॅटररला त्या व्यवहारात जो नफा होणार होता त्यावर देखील कोणताही इन्कमटॅक्स तो सरकारला देणार नव्हता. हॉलवाला व कॅटरर ती एक लाखाची कॅश अशीच आणखी कुठे तरी खर्च करणार होते.
*-आणि, नोटाबंदी आली !!*
नोव्हेंबर २०१६ च्या ८ तारखेला काय झालं बघा. रात्री ८ च्या सुमारास मोदींनी टीव्हीवरून अचानक नोटाबंदी जाहीर केली. त्या रात्री ८ वाजता क्ष प्रवासात होते. रात्री नऊ वाजता ते घरी आले. घरात सुमारे १९ लाख रूपये ब्लॅक असल्याचं त्यांना माहित होतं. एका तासानी रात्री १० वाजता दुकानं बंद होणार होती. बँका तर संध्याकाळी ७ वाजताच बंद झाल्या होत्या. अशा स्थितीत ते सगळे १९ लाख इतक्या घाईत खर्च करणं शक्य नव्हतं. शिवाय नोटा रद्द झाल्या म्हंटल्यावर बाहेरचे दुकानदारही गडबडले होते. तेही आता पाचशे हजाराच्या नोटा घेणार नव्हते.
क्ष यांना रात्री १२ च्या आत ते १९ लाख खर्च करता आले नाहीत. रात्री बारा वाजता त्यांनी आपल्या कपाटाच्या खणात नजर टाकली. रद्द झालेल्या नोटांची बंडलं पाहून ते अस्वस्थ झाले.
*क्ष नी काय केलं?*
दुसरे दिवशीची ९ नोव्हेंबर ची सकाळ उजाडली. सगळीकडे खळबळ उडालेली. जिकडे तिकडे एटीएम आणि बँकांपुढे रांगा लागल्या होत्या. काही लोक मोदींना शिव्या घालताना, तर काही बरं झालं, त्रास होईल पण देशासाठी चांगला निर्णय आहे असंही म्हणत होते.
क्ष वरून शांत आणि आतून अस्वस्थ होते. त्यांनी आपल्या चार्टर्ड अकाऊंटंटला फोन केला. तो म्हणाला बँकेत भरलेत तर नोटांबरोबर तुमचा पॅन नंबर घेतील आणि मग तो इन्कम मानला जाईल, व त्यावर टॅक्स बसेल. क्ष सीएला म्हणाले टॅक्स भरायचा नाही म्हणून तर ब्लॅक घेतले होते. दुसरा काही मार्ग नाही का?
सीए म्हणाला केमिस्ट आणि पेट्रोल पंपावर नोटा घेताहेत. जमतील तेवढ्या तिथे वापरून टाका.
त्यावर क्ष म्हणाले अहो एकोणीस लाख आहेत. किती पेट्रोल आणि औषधं घेणार?
सीए म्हणाला अजून वेळ आहे. ३१ डिसेंबर पर्यंत वेळ आहे. घाई कशाला करता. बघू नंतर.
सीएनी फोन बंद केला. क्ष त्यामुळे आणखीच अस्वस्थ झाले. त्यांच्याच सारखे त्यांचे ब्लॅक मित्र काय करताहेत इकडे त्यांनी कान टवकारले.
*क्ष यांचा ब्लॅक मनी बँकेत शिरला.*
असं होत होत ३१ डिसेंबर जवळ आला. शेवटी मनावर दगड ठेवून सहा लाख रूपये स्वतःच्या आणि पाच लाख रुपये बायकोच्या खात्यात त्यांनी भरले. अकरा लाख तर झाले. उरले आठ. त्यातले एकेक लाख त्यांनी आपला सख्खा भाऊ आणि बहीण यांच्या खात्यात ठेवायला दिले. उरले सहा लाख. क्ष ना काय करावं कळेना. शेवटी ते सहा लाखही तीन तीन लाख विभागून त्यांनी आपल्या व बायकोच्या खात्यात भरून टाकले. त्यांच्या कडचे सगळेच्या सगळे एकोणीस लाख अशा प्रकारे ३१ डिसेंबर पर्यंत मार्गी लागले. त्या ३१ डिसेंबरच्या रात्री क्ष यांनी एक पेग जरा जास्तच घेतला. चिअर्स म्हणताना त्या पेग मध्ये बँकेत गेलेल्या कॅश चा सोडा चांगलाच फसफसून वर घशाशी येत होता.
*बँकेत भरले, पवित्र झाले?*
आता स्थिती समजून घ्या. क्ष यांच्या खात्यात ९ लाख आणि त्यांच्या बायकोच्या खात्यात ८ लाख कॅश भरली गेली होती. क्ष यांचे भाऊ, बहीण नोकरी करणारे होते. त्यांनी घाबरत घाबरत एक एक लाख आपल्या खात्यात जमा केले. झाले एकोणीस लाख. 'आपण पार्टीत एक लाख तेव्हा खर्च केले ते बरं झालं, चांगली बुद्धी झाली तेव्हा' असंही ते मनात म्हणाले. ते एक लाख घेणार्या कॅटररनेही आपल्या जवळची कॅश अशीच शेवटी बँकेत भरून टाकली.
क्ष यांच्या कडे जे १९ लाख रुपये ब्लॅक मनी होता तो त्यांनी बँकेत भरला म्हणजे व्हाईट झाला का? नीट विचार करून बघा.
बँकेत भरलेल्या पैशावर श्री आणि सौ. क्ष यांना आता टॅक्स भरावा लागणार आहे. असे हजारो लाखो ह ळ क्ष ज्ञ देशात आहेत. त्यांनी आपल्या जवळच्या सर्व मोठ्या नोटा बँकेत भरल्यामुळेच तर देशातल्या ९९ टक्के नोटा बँकेत आल्या आहेत. पण त्या नोटा आपोआप व्हाईट झालेल्या नसून त्यावरचा टॅक्स आता देशाच्या तिजोरीत जमा होणार आहे.
R
*नोटाबंदी आली नसती तर?*मोदींनी नोटाबंदी आणली नसती तर? तर ते १९ लाख ब्लॅक रूपये क्ष यांच्या कपाटात आणखी काही महिने पडून राहिले असते. आणखी एक दोन पार्ट्या क्ष नी केल्या असत्या. आणखी आयकर, सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स त्यांनी बुडवला असता. कदाचित नंतर तो पैसा सोन्याचांदीत गुंतवला असता. पण आता क्ष यांच्या कडचा निदान नोटांमधला ब्लॅक मनी तरी संपला. यापुढे ते जी पेमेंटस करतील ती व्हाईट मनी मधून करतील. त्याची रितसर पावती टॅक्स भरून घेतील. नोटाबंदी नंतर सहा महिन्यांनी जीएसटी आल्याने आर्थिक शिस्तीचं वर्तुळ पूर्ण व्हायला बरीच मदत झाली आहे.
*भाबड्यांची टीका*
९९ टक्के नोटा बँकेत आल्या म्हणजे त्या व्हाईट झाल्या, आणि नोटाबंदी फसली असा अर्थ त्यातून काढणं हा आर्थिक भाबडेपणा आहे.
इथे सगळेच मुद्दे आणलेले नाहीत. काही ब्लॅक मनी हा सोन्याच्या, हिरे जड जवाहिर वा जमिन जुमल्याच्या स्वरूपात आहे. तो नोटाबंदी मुळे बाहेर आला का? अजिबात नाही. २००० च्नो नोटा बनावट निघणार नाहीत का? नक्कीच निघतील. अतिरेक्यांकडल्या पाचशे हजाराच्या नोटा नोटाबंदी नंतर रद्दी झाल्या. काश्मीर मध्ये बँकांवर एटीएम वर दरोडे पडू लागले. आता ते २००० च्या नोटा तयार करतील.
नोटाबंदी म्हणजे अनेक पायांच्या ब्लॅक मनी नामक ऑक्टोपसचा फक्त एक पाय मोडणं आहे. त्याचे आणखी बरेच पाय यथावकाश मोडावे लागतील.
*उलट्या बोंबा*
गेल्या सत्तर वर्षांत जे साठले आहे ते तीन वर्षांत आटोक्यात आणले नाही म्हणजे मोदी सरकार फसले, देशाची माफी मागा वगैरे टीका ही चोराच्या उलट्या बोंबा आहेत.
कोयला, थ्रीजी, टूजी, कलमाडी वगैरे घोटाळ्यात काही लाख कोटींना देशाला फसवणारे लोक आज नोटा छापायला 20000 कोटी खर्च आला म्हणून कळवळले आहेत. खरं म्हणजे माफी मागायला हवी ती घोटाळे करून देशाला लुटलेल्यांनी.
टीका काय होतेय ते नीट समजून घ्या इतकाच मुद्दाा इथेे मांडायचा आहे. सावधपणे ऐका कोण काय ओरडताहेत ते. बाय द वे चारा घोटाळावाला लालू पण एनडीटीव्ही च्या सुरात सूर मिसळताना तुम्हाला उद्या दिसेल. "देशाचं नुकसान केलं मोदी सरकारनी" असं म्हणत बिहारी लालू लाखांचा मेळावाही घेईल. त्याला ममता, राहुल, येचुरीही येतील.
इतकच सांगायचय की, सावधपणे सगळं समजून घ्या. 🙏
--------------------------------------
*माधव शिरवळकर* यांच्या ब्लॉग वरील पोस्ट
--------------------------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment